

गजानन चौकटे
गेवराई : तळणेवाडी या साध्या, शांत आणि साधनसंपत्तीअभावी होरपळलेल्या गावात एक मुलगा रोज सकाळच्या प्रकाशात शेताकडे निघत असे. हातात कापडी पिशवी आणि मनात प्रचंड मोठं स्वप्न “मी एक दिवस एअर फोर्समध्ये जाईन.” तो मुलगा म्हणजे फक्त २० वर्षांचा अनिकेत प्रभाकर लाड, ज्याने परिस्थितीला हरवून इंडियन एअर फोर्समध्ये एअर मॅन म्हणून निवड झाली आहे.
घरात नेहमीच कष्टाची हवा असायची. वडील प्रभाकर लाड हे लोहारकाम करतात, पण त्या छोट्याशा गावात लोहारकामातून मिळणारे उत्पन्न कधी कधी घरखर्चापुरतेही पुरेसे नसते. नांगराचे फाळ तयार करणे, तुटलेली अवजारे सांधणे—त्यातून मिळणारे काही रुपये आणि घरातील मोठा संघर्ष. अशा वेळी मुलाच्या शिक्षणाचा खर्च हा त्यांच्या मनावरचा सर्वात जड प्रश्न होता.
पण अनिकेतने परिस्थितीसमोर कधीही हात टेकले नाहीत. तो इतरांच्या शेतात जाऊन कापूस वेचत असे, कधी एकेक कळी वेचताना हाताला झालेल्या चिरा पुसत तो मनात सतत स्वतःलाच सांगत असे—“माझं आयुष्य इथं थांबणार नाही.”
शिक्षक दीपक पूरी सरांनीही अनिकेतची धडपड लांबूनच ओळखली होती. कधी फी, कधी पुस्तके, तर कधी प्रोत्साहन—सरांचा मोलाचा हातभार अनिकेतसाठी अंधारातला दीप ठरला. “मुलगा काहीतरी करू शकतो” या विश्वासाने त्यांनी त्याला नेहमीच उभारी दिली. गावातील इतर मुले जिथे हलक्या फुलक्या गोष्टींत वेळ घालवत, तिथे अनिकेत मात्र शांत कोपऱ्यात बसून अभ्यास करीत असे.
एअर फोर्सची परीक्षा जिंकणे फक्त अभ्यासाचा नव्हे, तर मानसिक धैर्याचा देखील संघर्ष होता. तरीही त्याने एक एक पायरी चढत अखेर प्रवेश प्रक्रियेत उत्तीर्णची बातमी घरी आणली. ती बातमी ऐकताच त्यांच्या घरात जणू उजाडून आले—जुनी झोपडीसारखी घरकुल अचानक समाधानी आणि तेजस्वी वाटू लागली. वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे थेंब तर अनिकेतच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांच्या संघर्षाला मिळालेलं समाधान होत.
आज तळणेवाडीमध्ये अनिकेत लाडचे नाव अभिमानाने घेतले जाते. कापूस वेचून शिक्षण घेणारा मुलगा आता भारतीय हवाई दलाचा भाग बनलेला आहे. त्याने गावातील प्रत्येक तरुणाला एक संदेश दिला आहे—“स्वप्नं मोठी असू द्या; परिस्थिती लहान पडते.” या यशाबद्दल गावातील सरपंचअविनाश धस , उपसरपंच लहू शिंदे , तुकाराम धस , शरद बोरकर यांनी अभिनंदन केले
शिक्षकांच्या डोळ्यात ही अश्रू
“अनिकेतच्या यशाची बातमी गावात पोहोचताच केवळ कुटुंबाच्याच नाही, तर त्याला साथ देणाऱ्या दिपक पूरी शिक्षकांच्या डोळ्यांतही अभिमानाचे अश्रू दाटून आले.”