

केज :- केज तालुक्यातील सातेफळ येथे आठ महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित तरुणीने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले आहे. सातेफळ तालुका केज येथे १ डिसेंबर रोजी प्रतीक्षा उर्फ राणी दीपक (पापा) भांगे या २५ वर्षीय विवाहितेने शेतात बाभळी झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५:०० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
आत्महत्येची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गित्ते हे घटनास्थळी हजर झाले. त्या नंतर प्रेत उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदन हलविले. दि. २ डिसेंबर रोजी प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मांजरे यांनी दिली आहे.
दरम्यान प्रतीक्षा उर्फ राणी भांगे हिचे लग्न दिपक (पापा) भांगे यांच्या सोबत माहे एप्रिल २०२५ रोजी झाले होते. तिच्या लग्नाला फक्त आठ महिनेच झाले होते. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.