

Beed NCP Leader Crime News
बीड: बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे यांच्यावर महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू असून या कालावधीत नारायण शिंदे यांनी पीडित महिलेकडून तब्बल एक कोटी दहा लाख रुपये घेतल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. गंभीर बाब म्हणजे हे प्रकरण मिटवण्यासाठी वाल्मीक कराड याने मध्यस्थी केल्याचा दावा या महिलेने तक्रारीत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण शिंदे याने एप्रिल 2006 ते डिंसेबर 2022 या कालावधीत आपल्या राहत्या घरी (क्रांती नगर, तहसील ऑफिसच्या पाठीमागे, नगर रोड, बीड) आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी पीडित महिलेवर अत्याचार केला. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या विरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तिच्या कडून फ्लॅटसाठी व इतर कामासाठी पैसे घेऊन विश्वास घात केला. याबाबत तक्रार दिल्यास जिवे मारण्याचीही धमकी दिली.
अखेर महिलेने शिंदे याच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत.