

केज : केज ते कळंब दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भेगा यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग नसून जणू हा ' डेथ ट्रॅपच' झाला आहे; पण त्याकडे कुणाचे लक्ष नाही. खामगाव- सांगोला राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८- सी यावर केज ते धाराशिव जिल्ह्यातील कळंबजवळ असलेल्या मांजरा नदीवरील पुलाजवळ अनेक ठिकाणी रस्ता खचून त्यावर भेगा पडलेल्या आहेत.
या भेगामध्ये दुचाकीचे टायर जाऊन दुचाकी चालकांचा भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या काही भागात या भेगा सुमारे तीन इंच ते सहा इंच रुंदीच्या असून त्याची लांबी पन्नास ते शंभर मीटर अशी आहे.
या महामार्गावरून दिवसभरात अनेक वाहने ये-जा करीत असतात. तसेच लोकप्रतिनिधी आणि महामार्ग रस्ते विकास मंडळाचे अधिकारी, तसेच प्रशासकीय अधिकारीदेखील ये- जा करीत असतात. मात्र, सर्वजण याकडे दुर्लक्ष करतात. एखादी दुर्घटना घडल्यास सर्वजण हळहळ व्यक्त करतात; पण या महामार्गावर घडणाऱ्या संभाव्य अपघात रोखण्यासाठी मात्र कोणीही उपाययोजना करण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नाही.
👉 मांजरा नदीवरचा पूल मागील आठ वर्षा पासून पूर्ण झालेला नाही.
👉 प्रत्येक पुलावर जम्प असल्याने भरधाव वेगातील वाहने पुलावरून धावताना हेलकावे घेतात.
👉 गावा जवळ बसविलेले पथदिवे हे निव्वळ शोभेच्या वस्तू झालेल्या असून ते सुरू कधी होणार ?
👉 रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये किंवा अचानक कोणी व्यक्ती, प्राणी, वाहन आडवे येऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाळ्या आणि बॅरीकेटिंग बसविलेले नाही.
👉 दुचाकी वाहनासाठी केलेल्या खुणा व पांढरे पट्टे व पुसट झाले आहेत.
👉 वाहनचालकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बसविलेले पिवळे, लाल हिरव्या रंगाचे रिफ्लेक्टर्स खराब झालेले आहेत.
👉 अनेक ठिकाणी साइड पट्ट्या आणि पंखे खचून चढ उतार तयार झालेले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या खाली असलेले वाहन रस्त्यावर घेता येत नाही.
👉 काही ठिकाणी रस्त्यावर पाणी देखील साचत आहे.
👉 रस्त्याच्या कडेला अतिक्रमण वाढलेले आहे.