

बीड ः मुस्लीम समाजाचे काढून घेण्यात आलेले आरक्षण पुन्हा लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी शुक्रारी दुपारी रणरणत्या उन्हात बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. किला मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला होता. या मोर्चात हजारो मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले. मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले.
सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने आरक्षण प्रश्नावर शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची गेल्या एक महिन्यापासून तयारी सुरु होती. बीड शहरासह गावागावात जावून बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला आरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले हेोते. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
शहरातील किला मैदान येथून दुपारी दोन वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन तीन वाजण्याच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. यावेळी बोलतांना मोर्चाचे समन्वयक अरबाज पठाण यांनी मुस्लीम समाजातील तरुणांना नोकरीच्या संधी मिळाव्यात, शिक्षणात सवलती मिळाव्यात याकरिता आरक्षणाची गरज व्यक्त केली.
मी बीड जिल्ह्यातून ही आरक्षणाची चळवळ हाती घेतली असून राज्यभरात अशा पद्धतीने मोर्चे काढले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुस्लिम समाजावर बेताल वक्तव्य करणाऱ्यांना देखील अरबाज पठाण यांनी इशारा दिला. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले.