

अंबाजोगाई :- अंबाजोगाई तालुक्यातील हातोला शिवारात पत्नीचा खून करून तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेणाऱ्या पतीचा बनाव बर्दापूर पोलिसांनी मृत महिलेच्या भावाच्या समय सूचकतेमुळे उधळून लावला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीस ताब्यात घेऊन अटक केली आहे.
याबाबत घटनेची हकीकत अशी की अंबाजोगाई तालुक्यातील बरदापुर पोलीस ठाणे हद्दीतील हातोला शिवारात शेतात सालगडी म्हणून काम करणारा सुरेश शेरफुले याने शुक्रवार दि २३ रोजी संध्याकाळी कौटुंबिक वादातून पत्नी शीलाबाई (वय ४५) हिची काठीने डोक्यात व शरीरावर वार करून हत्या केली. हा हत्या लपवण्यासाठी त्यानंतर त्याने हृदयविकाराचा बनाव रचून तो मृतदेह घेऊन देगलूर तालुक्यातील आलूर या त्याच्या मूळ गावी घेऊन गेला.
गावाकडे शिलाबाई हिस हार्ट अटॅक येऊन ती मयत झाल्याचे सांगितले. मात्र मयत शिलाबाई हिच्या अंगावरील जखमा पाहून तिच्या भावास संशय आला. त्याने आपल्या बहिणीस अटॅक आला तर या त्यांच्या शरीरावर जखमा कशा झाल्या असे विचारताच यावर पती सुरेश याने उलटसुलट उत्तरे दिली. तेव्हा मयत शिलाबाई हिच्या भावाने पोलिसात धाव घेतली. दरम्यान देगलूर पोलिसांनी बरदापुर पोलिसांशी संपर्क साधून सदर घटनेचा तात्काळ छडा लावला. तपासाची चक्रे वेगवान फिरवत संशयावरून मयताचा पती सुरेश यास समय सूचकता दाखवत अंत्यविधीपूर्वीच ताब्यात घेतले.
मयत शिलाबाई यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास तथा शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेचा तपास व कार्यवाही देगलूर पोलीस तसेच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.