

परळी वैजनाथ : शहरातील सरस्वती नदीत अवैधरित्या भराव टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार झाले होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपरिषद प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली होती. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी (दि.७) नगरपरिषदेने २५ जणांना नोटीसा बजावल्या. नदीतील अतिक्रमणे स्वतःहून न काढल्यास नगर परिषदेच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आला.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील सरस्वती नदीत होत असलेल्या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत त्याची पाहणी केली होती. परळीच्या जुन्या गावातून वाहत असलेल्या सरस्वती नदीत अवैधरित्या भराव टाकण्याच्या होत असलेल्या कामाबद्दल मंत्री मुंडे यांनी नगरपरिषद प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत परळी परिषदेने नदीपात्रात अतिक्रमण केलेल्या २५ नागरिकांना सोमवारी नोटीसा बजावल्या.
सरस्वती नदीवर अतिक्रमण केलेल्या २५ जणांना नगरपरिषदेच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या असून हे अतिक्रमण न काढल्यास कायदेशीर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी दिला आहे.