

Elderly dead body in Majalgaon
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील नित्रुडजवळ कुजलेल्या अवस्थेत एका वृद्धाचा मृतदेह सापडल्याची घटना सोमवारी (दि.१) दुपारी उघडकीस आली. दरम्यान दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृताची ओळख पटवली असून मृत्यू कशामुळे झाला यासाठी तपास सुरू केला आहे.
पालखी महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव राज्य महामार्गावर नित्रुड शिवारातील एका पडकात दुर्गंध येत असल्याकारणाने स्थानिकांनी पाहिले असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या माहितीवरून दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृताची ओळख त्याच्या खिशातील कागदपत्रावरून पटवण्यात यश मिळवले.
बाबू रानबा तिडके (वय ६९, रा. रामनगर, गोविंदवाडी, ता.माजलगाव) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी घटनास्थळावर मृताचे नातेवाईक दाखल झाले होते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पात्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मायकर यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
अंदाजे सहा ते सात दिवसांपूर्वी तिडके यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. दरम्यान ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास दिंद्रुड पोलीस करीत असून घटनास्थळावर दोन विषाच्या व १ मद्याची बाटली सापडल्याची माहिती दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी दिली आहे.