Beed news: माजलगावच्या संभाजी महाराज चौकात ‘रातोरात’ पुतळा उभारला

Sambhaji Maharaj statue: कायद्याच्या मर्यादा धुडकावत प्रतिष्ठानचा विद्रोही जल्लोष
Beed news
Beed news
Published on
Updated on

माजलगाव: कायद्याच्या गुंतागुंतीत अडकलेले महापुरुषांच्या स्मारकांचे प्रस्ताव वर्षानुवर्षे धूळ खात पडतात… दोन पिढ्या जातात, फाईल हलत नाही. परंतु या काचेच्या राजकारणाला छेद देत माजलगावात एका धडाडीच्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शैर्य प्रतिष्ठाणने कायद्याच्या चक्राला अक्षरशः शिंगावर घेतले आणि रातोरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या संभाजी चौकात रोवून जाहीर जल्लोष केला.

शुक्रवारी (दि.१४) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जेसीबीच्या सहाय्याने लोखंडी अँगलवर पुतळा उभारला. पुतळा बसताच फटाक्यांचा कडकडाट, घोषणांचा गजर आणि “जय छत्रपती संभाजी महाराज की जय!” च्या आरोळ्यांनी संपूर्ण चौक दणाणून गेला. हा सगळा प्रकार अक्षरशः काही मिनिटांत पार पडला.

कायद्याच्या ‘फाईलशाही’ला थेट आव्हान

माजलगाव शहरातील डॉ . आंबेडकर चौकात ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मागणी पन्नास वर्षांपासून होती,परंतु कायदेशीर अडथळ्यांच्या भूलभुलैय्यातून कोणीच बाहेर पडू शकले नाही. तसंच सोळंके महाविद्यालयातील लोकनेते सुंदरराव सोळंके यांच्या अर्धाकृती पुतळ्यालाही मुख्य गेटसमोर स्थान मिळू शकले नाही. कायद्याचा ताण, मानकांचे कारण पुढे करून पुतळा महाविद्यालयाच्या आत पाठवण्यात आला. तेथे तो नजरेस पडतही नाही.अशा परिस्थितीत “कायद्याच्या नावाखाली स्मारकांना वर्षानुवर्षे अडवायचे आणि दुसरीकडे तडजोडी करत बेकायदेशीर पुतळे चौकाचौकात उभारू द्यायचे?” असा प्रश्न शहरात चव्हाट्यावर यायला लागला आहे.

विद्रोहाची रात्र, दणाणून टाकणारी घोषणा

गत काही महिन्यांत राज्यभरात कार्यकर्ते “कितीही केसेस लागल्या तरी पुतळे उभारू!” अशा भूमिकेत उतरले आहेत. त्याच धाटणीचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे माजलगावातील हा धाडसी प्रकार. रात्री २ वाजता जेसीबी, लोखंडी अँगल, तिरंगा, फटाके—सगळं व्यवस्थित नियोजन करून प्रतिष्ठानचे कार्यकर्ते थेट चौकात पोहोचले. पुतळा बसवताना वातावरणात जोश, आणि नंतर घोषणांचा जंगला. सध्या हा नवा पुतळा चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या नजरेखाली सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

जुन्या मागण्यांना नवी दिशा?

या घटनेनंतर शहरात चर्चांना उधाण आलं आहे. पन्नास वर्षे थांबलेला आंबेडकर चौकाचा प्रश्न डॉ बाबासाहेबाचा पुतळा, सोळंके महाविद्यालयातील लोकनेते सुंदरराव सोळंके स्मारक इतर महापुरुषांच्या स्मारकांवरील कागदी अडथळे या सगळ्यांवर आता “प्रत्यक्ष कृती आणि विद्रोह” हाच मार्ग उरला आहे का, असा प्रश्न अनेकांच्या तोंडी आहे. रातोरात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा फक्त एक मूर्ती नाही; तो शहरातील प्रशासकीय सुस्तावलेल्या प्रक्रियेविरोधात उठलेला विद्रोही इशारा आहे. माजलगावच्या राजकीय-सामाजिक वातावरणात या घटनेचे पडसाद पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर उमटण्याची शक्यता आहे.व आसे महापुरुषांचे पुतळे माजलगाव शहरात कुठे ही कुठल्याही चौकात आस्याच प्रकारे उभारले जादु शकतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news