

मनोज गव्हाणे
नेकनूर: अहिल्यानगर - अहमदपुर मार्गावरील मांजरसुंबा-केज रस्त्याचे भिजत घोंगडे कायम असून नाल्या अर्धवट अवस्थेत असल्याने नेकनुरमध्ये पाणी रस्त्यावर वाट शोधत आहे. यामुळे वाहनधारकांना प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. काम पूर्ण झाले नसतानाही केज जवळील टोल महिन्यापूर्वी सुरू करून कंपनीने वाहनधारकांना वेठीस धरणे सुरु केले आहे. टोल घेता मग अर्धवट कामे कधी पुर्ण करणार अशी विचारणा वाहनधारकातून होत आहे.
मांजरसुंबा-केज दरम्यान रस्ता सुरू झाल्यानंतर काही कालावधीतच मोठमोठ्या भेगा पडल्या अनेक आवाहनधारकांचे अपघात झाले. याकडे दैनिक पुढारीने लक्ष वेधल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले मात्र रस्त्याला लेवल नसल्याने अपघाताची मालिका कायम आहे. नेकनूरमध्ये तर नाल्याच बनवल्या गेल्या नसल्याने पाणी रस्त्यावरच ओढ्याचे स्वरूप घेत मार्ग शोधताना पाहायला मिळते. यामुळे वाहन धारकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत.
याशिवाय पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी जात असल्याने तू-तू, मै-मै होत आहे. अशीच परिस्थिती केजपर्यंत अनेक ठिकाणी असून या मार्गावर नित्याने अपघात होत आहेत. असे असतानाही केज जवळील महिन्यापूर्वी टोल सुरू करून वसुली केली जात आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अर्धवट कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश रस्ता कंपनीला द्यावेत अशी मागणी प्रवाशातून होत आहे.