Beed Leopard cub death : दौलावडगावात कुत्र्याच्या हल्ल्यात बिबट्याच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू!

थोरात वस्ती परिसरातील घटना; माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन
प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
Published on: 
Updated on: 

कडा : आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील थोरात वस्ती परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात बिबट्याच्या एका पिल्लाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

दौलावडगाव येथील थोरात वस्ती परिसरात बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, कुत्र्याच्या हल्ल्यात या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून वनविभागाला मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू केली.

आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याच्या पिल्लाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्यात आली.

या कारवाईदरम्यान वनपाल तागड, वनरक्षक के. बी. विधाते मॅडम, वनसेवक युनूस शेख, बन्सी तांदळे, जयसिंग मोहिते, गोरख पवार, कानिफ पवार, दत्तू भुकन आदी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर आणि वन्यजीवांशी संबंधित घटनांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तसेच वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.

वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ वनविभागाची नसून नागरिकांचाही त्यात महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळे वन्यप्राणी आढळल्यास त्यांना त्रास न देता तातडीने वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.