

बीड : सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी बाळू आवारे हा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रेरणेने काम करत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करून बेकायदा पुतळे बसवण्यामागे दहशत निर्माण करण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. या प्रकरणी बाळू आवारेसह मनोज जरांगे यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी त्यांनी मंगळवारी (दि. 7) बीड येथील पत्रकार परिषदेत केली.
बेकायदा पुतळे बसवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी रसद पुरवल्याचा खळबळजनक दावा हाके यांनी केला. “प्रकाश सोळंके यांनी 2 लाख रुपये दिले, तर नारायणराव कुचे यांनी 25-30 पुतळ्यांसाठी स्पॉन्सरशिप केली. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या समर्थकांनीही यात मदत केली,“ असे सांगत हाके यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लोकप्रतिनिधी असून तुम्हाला अक्कल नाही का? बेकायदा कृत्यांना समर्थन देताना प्रशासकीय नियमांची पायमल्ली का करता?“ असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.
नारायणगड येथील सप्ताहाच्या सांगता समारंभातील भाषणावर बोलताना हाके म्हणाले की, “जरांगे पाटील यांना बहुजनांच्या पोरांचे अस्तित्व मान्य नाही. धार्मिक कार्यक्रमात राजकारण कशाला? मनोज जरांगे हे अपघाताने घडलेले माणूस असून त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?“ 4 थी नापास माणसाकडून जर नियम पायदळी तुडवले जाणार असतील, तर त्यांच्याशी आमची युती कशी होऊ शकते, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुनेत्रा पवारांच्या एका फोनमुळे यू-टर्न
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याबाबत बोलताना हाके यांनी महायुतीसोबत जाण्याचे संकेत दिले. “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोन आला होता, त्यामुळे आपण आपली भूमिका बदलली. अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोन आले, पण सुनेत्रा ताईंचा दोन मिनिटांचा फोन विचार करायला लावणारा होता. माणसामध्ये परिवर्तन होऊ शकते, महाराष्ट्रात अनेक नेते यू-टर्न घेतात, मग मी सकारात्मक विचार केला तर त्यात गैर काय?“ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
चौथी नापास माणसाकडून जर नियम पायदळी तुडवले जाणार असतील, तर त्यांच्याशी आमची युती कशी होऊ शकते? छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नाहीत, त्यांचा अवमान सहन करणार नाही.
प्रा. लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक