

बीड; पुढारी वृत्तसेवा : सरकारी विभागाकडील रेकॉर्डमध्ये कुणबी जातीच्या नोंदींचा तपास सध्या सुरू आहे. निजामकालीन 1880 च्या जनगणनेनुसार मोडी भाषेतील कुणबी नोंदी सापडत आहेत. गेवराई भूमी अभिलेख कार्यालयात देखील कुणबी नोंद सापडतात का याचा शोध मंगळवारी (दि. 24) मोडी अभ्यासक यांनी केला. यावेळी गेवराई तालुक्यातील 183 गाव, वाड्याचे 148 रुमाल (दस्त) मध्ये गाव नमुना नंबर 33 व 34 यात कुणबी जात असल्याच्या अनेक नोंदी असल्याचे मोडी लिपी अभ्यासक डॉ.संतोष यादव यांनी सांगितले.
दरम्यान मंगळवारी (दि. 24) दिवसभरात त्यांनी तालुक्यातील 65 गावच्या दस्तापैकी 55 गाव दस्त तपासणी केली असता 52 गावात सर्व गावाची नोंद कुणबी असल्याचे आढळून आले आहे. तालुका भूमिअभिलेख कार्यालयात तब्बल निजाम सरकारच्या कामकाजाची दीडशे वर्षांपूर्वीची कागदपत्रे आढळून आली असून फक्त गेवराई तालुक्यात पाच हजराच्यावर कुणबी असल्याची नोंद सापडत असल्याचे मोडी अभ्यासक यांनी सांगितले.
गेवराई तालुक्यात एकूण 183 गाव, वाड्या आहेत. निजामकालीन रेकॉर्डनुसार 1880 साली झालेल्या जनगणनेनुसार गाव नमुना नंबर 33 व 34 मध्ये जनगणनेची नोंद करण्यात आली आहे. गाव नमुना नंबर 33 मध्ये चार प्रकारची नोंद व गाव नमुना नंबर 34 मध्ये 65 प्रकारची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये गाव नमुना नंबर 34 मध्ये अनुक्रमांक 6 मध्ये जातीची नोंद असून तालुक्यातील 65 गाव वाड्याच्या दस्तांची तपासणी केली असता 52 गाव, वाड्याच्या जातीची नोंद कुणबी असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. 1880 साली निजामाने केलेली जनगणना अतिशय काटेकोरपणे केली असल्याचे मोडी अभ्यासक यादव यांनी सांगितले. निजाम दर 11 वर्षांनी जनगणना करत होते. जनगणनेनुसार ते कर आकारणी करत होते. यामध्येच दीडशे वर्षापूर्वीच्या दस्तात जनगणनेनुसार कुणबी जात असल्याचे पुरावे आहेत. अजून तालुक्यातील काही गावचे दस्त नोंद शोधणे चालू आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कुणबीच्या नोंदी गेवराई तालुक्यात सापडल्या असल्याचे मोडी अभ्यासक डॉ.संतोष यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना माहिती देताना सांगितले आहे. तर राज्यात सरकारला आवश्यक असलेला कुणबी नोंदीचा मुख्य पुरावा असून याचा खजिनाच गेवराई तालुक्यात सापडला असून उर्वरित सर्व गावचे रेकॉर्ड तपासून याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करून ही माहिती सरकार पर्यंत पोहोच केली जाणार आसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी कळवले आहे.
जवळपास दीडशे वर्षांपूर्वी म्हणजे 1880 साली निजामकालीन जनगणनेत गाव नमुना नंबर 33 व 34 मध्ये गेवराई तालुक्यात पाच हजराच्या पुढे कुणबी जात असल्याच्या नोंदी सापडत आहेत. सापडलेला रेकॉर्ड शासनास दाखल करण्यात येईल. यानुसार कुणबी जात असल्याचे सिद्ध होवून आरक्षण देण्यास मदत होईल.
– डॉ.संतोष यादव (मोडी अभ्यासक)निजामकालीन जनगणनेत कुणबी जात असल्याच्या नोंदी सापडत आहे.मोडी अभ्यासक यांना आम्ही दीडशे वर्षापूर्वीचा रेकॉर्ड उपलब्ध करून देत आहोत.मिळालेल्या नोंदी वरिष्टना अहवालाव्दारे कळविण्यात येईल.
– आर.बी.गवळी, (शिरस्तेदार भूमी अभिलेख गेवराई)
संगम जळगाव, बोरगाव बु., पिपळगाव कानडा, पाथरवला बु., श्रीपती अतरवाला, लोणाळा, ढालेगाव, रामपुरी (यामध्ये तीन पटवेकरी मराठा म्हणून उल्लेख आहेत), पाडळससिंगी, रेवकी, माळहिवरा, वडगाव ढोक, अर्ध पिपरी, जातेगाव, खोपटी, मनुबाई जवळा, केकत पांगरी, कट चिंचोली, तांदळा, पांगुळगाव, शिराळा, शेकटा, राहेरी, गेवराई, ब्रम्हगाव, सुरलेगाव, गुंतेगाव, बंगाली पिपळा, पांडुळ्याचीवाडी, धुमेगाव, मारफळा, पांचाळेश्वर, हिंगणगाव, ठाकर आडगाव, बेलगुडवाडी, कोलतेवाडी, तळवट बोरगाव, आम्ला, सिंदफणा चिंचोली, रानमळा आदी गावात गावच्या गाव कुणबी आढळून आले तर आणखी पुढे तपासणी चालू असून आणखी मोठ्या प्रमाणात नोंदी आढळून येत असल्याचे या समितीने सांगितले.