

MPDA Act Beed
केज : केज शहरातील सराईत गुंड उमेर ऊर्फ पापा मुस्ताक फारोखी (वय ३०, रा. रोजा मोहल्ला, केज) याच्यावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
उमेर ऊर्फ पापा मुस्ताक फारोखी याच्याविरुद्ध वाटमारी, नागरिकांना धमकावून जबरीने पैसे व मोबाईल हिसकावून घेणे, लुटमार, चोरी तसेच इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी त्याच्या गुन्हेगारी कारवायांची सविस्तर माहिती संकलित करून महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक अधिनियम, १९८१ (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उमेर फारोखी याला स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले.
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अंहकारे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल नागरगोजे आणि पोलीस कॉन्स्टेबल राम पवार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे उमेर ऊर्फ पापा मुस्ताक फारोखी याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर २४ जून रोजी त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.