

Kaij Salegaon Tomato Crop Ruined
केज : रात्रंदिवस कष्ट करून चार पैसे हातात येतील, संसाराला आर्थिक हातभार लागेल आणि कर्जाचा भार हलका होईल, या आशेने टमाट्याची लागवड केली. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने ऐन बहरात आलेली टमाट्याची बाग पाण्याअभावी करपून गेली. डोळ्यांदेखत पीक सुकत असल्याचे पाहून हतबल झालेल्या शेतकरी बाळासाहेब गित्ते आणि त्यांचे वडील कल्याण गित्ते या बाप-लेकांनी अखेर आपली एक एकर टमाट्याची बाग उपटून फेकून दिली. लाखभर रुपये खर्च करूनही हातात काहीच न पडल्याने या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील बाळासाहेब कल्याण गित्ते हे ४० वर्षीय तरुण शेतकरी आहेत. त्यांनी वडिलोपार्जित जमिनीतील एक एकर क्षेत्रावर टमाट्याची लागवड केली होती. पिकाची चांगली वाढ व्हावी, यासाठी त्यांनी आंतरमशागत, खुरपणी, फवारणी आणि खतांचा वापर केला. टमाट्याच्या वेलींची वाढ होऊन फळे येण्यास सुरुवात झाली होती. वेलींना आधार देण्यासाठी त्यांनी शेतात बांबू उभे करून तारांच्या साहाय्याने बांधणीही केली होती.
टमाट्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने या पिकातून चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा गित्ते कुटुंबाला होती. त्यासाठी लागवडीपासूनच त्यांनी मेहनत घेतली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने पिकाला पाणी देण्याचा प्रश्न गंभीर बनला.
आज ना उद्या पाऊस पडेल आणि बाग पुन्हा तरतरीत होईल, या आशेने बाळासाहेब यांनी पीक जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसाअभावी पाण्याची उपलब्धता कमी होत गेली. परिणामी, ऐन बहरात आलेल्या टमाट्याच्या वेली सुकू लागल्या. फळांची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच ती कोमेजून जात होती. अखेर पाण्याअभावी संपूर्ण एक एकर क्षेत्रातील टमाट्याची बाग करपली.
मोठ्या कष्टाने लहान मुलाप्रमाणे जपलेले पीक डोळ्यांदेखत नष्ट होत असल्याने बाळासाहेब आणि त्यांचे वडील कल्याण गित्ते हतबल झाले. दुसरा पर्याय उरला नसल्याने दोघांनीही करपलेली बाग उपटून फेकून दिली. या घटनेमुळे त्यांच्या कष्टावर पाणी फिरले असून, कुटुंबाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
टमाट्याच्या लागवडीसाठी बाळासाहेब गित्ते यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. याशिवाय खते आणि औषधांसाठीही उधारी केली होती. पिकातून चांगले उत्पन्न मिळाल्यानंतर कर्जाची परतफेड आणि उधारी चुकती करता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे संपूर्ण पीक हातचे गेल्याने आता कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
मेहनत, खर्च आणि उत्पन्नाच्या आशेवर उभे केलेले पीक पाण्याअभावी नष्ट झाल्याने गित्ते कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला कसा बसत आहे, याचे हे उदाहरण ठरले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पाच हजार रु. मदत जाहीर केली आहे. त्यात लेकरा बाळांना नवे कपडे आणि फराळ कसा होणार ? त्या पेक्षा हेक्टरी १ लाख अनुदान दिले, तर शेतकरी जगेल.
- बाळासाहेब गित्ते, शेतकरी