

बीड : येथील जिल्हा कारागृहाचे वादग्रस्त अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर नागपूर कारागृहात बदली करण्यात आली आहे. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप होता. यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. याच प्रश्नावर आ. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत कारवाईची मागणी केली होती.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यांनी गायकवाड यांच्यावर हे गंभीर आरोप केले होते. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, नकार देणाऱ्या कैद्यांचा छळ करणे, भजन-आरती बंद करणे आणि महापुरुषांचे फोटो हटवून बायबलमधील श्लोक लावणे अशा तक्रारी होत्या.
यापूर्वी गायकवाड यांच्यावर विनापरवाना वृक्षतोड आणि कैद्यांकडून खासगी वाहन धुवून घेतल्याचेही आरोप होते. या सर्व गंभीर आरोपांची पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षता पथकांनी कसून चौकशी केली. मंगळवारी रात्री बीडमध्ये झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चामध्येही आ.गोपीचंद पडळकर यांनी गायकवाड यांना लक्ष करत त्यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली होती. तसेच हे प्रश्न आपण विधानसभेच्या अधिवेशनातही मांडणार असल्याचे म्हटले होते.
आरोपांमध्ये तथ्य आढळले ?
बीड कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याव वेगवेगळे आरोप गेल्या काही काळात झाले होते. याची तपासणी करण्यासाठी एक विशेष पथकही बीडमध्ये आले होते. या पथकाच्या अहवालानंतरच ही कारवाई झाल्याची माहिती असून, झालेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यानेच ही कारवाई झाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलत गायकवाड यांची बीडमधून नागपूर येथील कारागृहात बदली केली आहे. या बदलीमुळे बीडच्या कारागृह प्रशासनातील वादावर सध्या तरी पडदा पडला आहे.