Beed inspiring story | ऊसतोड कामगार म्हणून हिणवले! जिद्दीने चार सख्ख्या बहीणी झाल्या एकाचवेळी पोलिस दलात भरती!

जिवाचीवाडी येथील कुटुंबातील चार सख्ख्या बहिणी : ऊस तोड मजूरांच्या, ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरल्या उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली या बहीणी
Beed inspiring story
उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली या सख्या चार बहीणी एकाचवेळी पोलिसदलात भरती झाल्या
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज :- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दुर्गम अशा डोंगरी भागात असलेल्या जिवाचीवाडी येथील एका गरीब ऊसतोड मजूर कुटुंबातील उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली या चार सख्ख्या बहिणींनी कमालीचा संघर्ष, जिद्द आणि कठोर कष्टाच्या जोरावर नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत महाराष्ट्र पोलीस दलात एकाच वेळी स्थान मिळवले आहे. अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती असतानाही, या चारही भगिनींनी अहोरात्र घेतलेली मेहनत आणि त्यांच्या आई-वडिलांच्या अखंड त्यागामुळे हे अभूतपूर्व यश मिळाले असून, सध्या संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातील मुलींसाठी हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. हनुमंत चौरे आणि त्यांची पत्नी हे दोघेही वर्षानुवर्षे ऊसतोड मजूर म्हणून कष्ट करत आहेत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुली शिकल्या पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत या एकाच ध्येयाने त्यांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही.

मुलींनीही गावातूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा आणि आर्थिक संकटांचा सामना करत पोलीस भरतीचे स्वप्न मनात जिवंत ठेवले. एका ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी नियमित अभ्यास, कठोर शारीरिक सराव आणि स्वतःवरील विश्वासाच्या बळावर हे यश खेचून आणले. एकाच कुटुंबातील चार मुलींनी एकाच वेळी पोलीस दलात भरती होण्याची ही पहिलीच घटना मानली जात असून, या यशामुळे जिवाचीवाडी गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले आहे.

आयुष्यभर कष्ट केले, पण मुलींना शिकवण्याची जिद्द सोडला नाही. आज आमच्या चारही मुली पोलीस दलात दाखल झाल्या. यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही.

हनुमंत चौरे (वडील)

यशासाठी परिस्थिती नव्हे, तर जिद्द महत्त्वाची असते. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी.

उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news