

बीड पुढारी वृत्तसेवा : मी गुंडाला गुंड आहे तर बंडाला बंड आहे परंतू जनतेच्या प्रति मात्र माझ्या मनात कायम प्रेम असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला. बीडच्या पाटोदा तालुक्यातील महासंघ येथे असलेल्या महंत मीराबाई आईसाहेब संस्थानच्या सप्ताह सांगते प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या.
पाटोदा तालुक्यातील महासंघ येथील महंत मीराबाई आईसाहेब यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाची आज सांगता झाली यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला. माझे बाबा गोपीनाथ मुंडे यांनी मला या ठिकाणी दरवर्षी येत असे सांगितले होते. त्यामुळे मी या ठिकाणी दरवर्षी येते आज महत्त्वाचे काम होते तरी देखील मी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. या ठिकाणच्या महंत राधाताई महाराज व मी जवळपास सोबतच काम सुरू केले त्यांनी धार्मिक क्षेत्रात तर मी राजकारणात काम करत आहे आम्ही दोघेही मोठ्या होत गेलो राजकारण करणाऱ्यांनी केवळ राजकारणच करावे धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्माचे काम करणाऱ्यांनी राजकारणात हस्तक्षेप करू नये असे देखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. संत भगवान बाबा यांच्या दर्शनासाठी मला कुठे जावे लागत नाही मी डोळे बंद केले की त्यांचे दर्शन होते संत भगवान बाबा यांनी आपले जीवन समाजासाठी अर्पण केले होते हे करणे एवढे सोपे नाही असे त्या म्हणाल्या.
आता आष्टीवर जास्त प्रेम करावे लागणार आहे हा भाजपाचा मतदारसंघ आहे परळी मतदारसंघ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला त्यामुळे आता या मतदारसंघात वारंवार यावे लागणार आहे कामाचे उद्घाटन देखील करावे लागणार आहेत असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. जिल्ह्यात आता अजित पवार हे पालकमंत्री आहेत मी भाजपाची संपर्क मंत्री आहे त्यामुळे शिस्तीत कामे व्हायला हवीत अजित पवार हे स्वतः अर्थमंत्री देखील आहेत त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही असे म्हणत पंकजा मुंडे यांनी बीडच्या विकासासाठी भरीव योगदान देणार असल्याचे स्पष्ट केले याबरोबरच विरोधकांना इशारा देत मी गुंडाला गुंडा आहे तर बंडाला बंड आहे मी कोणाला घाबरत नाही असे म्हणत जनते प्रति मात्र माझ्या मनात कायमच प्रेम असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.