

Complete Loan Waiver Farmers Demand
गोरेगाव : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते गजानन कावरखे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.८) गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या 2026 च्या कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाची प्रत जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारने "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना" जाहीर केली असली तरी त्यामध्ये अनेक अटी व शर्ती लावून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी नसून "कर्ज वसुली योजना" असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी गजानन कावरखे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीरपणे सांगितले गेले होते. मात्र, प्रत्यक्ष शासन निर्णयात विविध निकष आणि अटी लावून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने आपल्या आश्वासनाचा मान राखून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शेतकरी हिताच्या नावाखाली फसवणूक सहन केली जाणार नाही. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात परिसरातील शेतकरी, कार्यकर्ते व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.