

गेवराई : बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील, गावातील जुन्या तलावाला तडा गेला आहे. वाढत्या अडचणीच्या स्थितीचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वरीष्ठांना सुधारीत अहवाल सादर करुन तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेकडून होत आहे.
या गावाची लोकसंख्या अंदाजे वीस ते बावीस हजार अधिक आहे. येथील तलावाची स्थिती अत्यंत नाजूक झाली असून हजारो लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख खिजर यांनी तहसीलदार खोमणे यांना सविस्तर माहिती दिली. याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे, दरम्यान नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी असल्याचे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख खिजर जेनोदिन आणि तालुकाध्यक्ष जयदेव शिंगणे यांनी प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहिले नाही, तर शेतकरी संघटनेकडून आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.
प्रशासनाची टाळाटाळ, ग्रामस्थांमध्ये चिंता
गावाजवळील तलाव धोकादायक स्थितीत असून कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. तलावाच्या संरक्षण भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण हा या धोक्याचे मूळ कारण ठरत आहे. अतिक्रमण तातडीने हटवून संरक्षण भिंतीची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.