

Rakshasbhuvan illegal sand transport
गेवराई : तालुक्यातील चकलांबा-येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालताना राक्षसभुवन येथून दोन वाहनाद्वारे वाळूची चोरटी वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या टीमने सापळा रचून दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. तब्बल २८ लाख १० हजारांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाया सुरु असून मध्यरात्री राक्षसभुवन येथून दोन वाहनाद्वारे वाळूची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार राक्षसभुवनच्या रस्त्याचे बाजूला शेतात अंधारात पोलिसांनी दबा धरून बसत वाळू वाहतूक करणारे दोन्ही वाहने एकापाठोपाठ ताब्यात घेतले.
या कारवाईत २८ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, अमोल येळे, कैलास खटाने, हनुमान इंगोले यांच्या वतीने करण्यात आली.