

गेवराई : गेवराई शहरातील शतायू हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर चार रुग्णांची प्रकृती खालावल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यापैकी एका ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने शनिवारी (दि. १४) शहरात खळबळ उडाली. बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या नाथा दशरथ गायकवाड (वय ६५, रा. कोल्हेर, ता. गेवराई) यांचा मृतदेह नातेवाईकांनी शतायू हॉस्पिटलसमोर आणून ठेवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथील चार रुग्ण पोटदुखी आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळे शतायू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांना पुढील उपचारांसाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
यापैकी नाथा दशरथ गायकवाड यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह शतायू हॉस्पिटलसमोर आणून ठेवला. तसेच संबंधित डॉक्टरांच्या उपचारपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चुकीच्या उपचारांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला.
या प्रकरणातील इतर रुग्णांमध्ये गयाबाई लक्ष्मण गायकवाड, उत्तम नामदेव गायकवाड आणि पवार आडनावाच्या एका रुग्णाचा समावेश असल्याचे समजते. या तिघांवर गेवराई आणि पुणे येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी शतायू हॉस्पिटल बंद असल्याने डॉक्टर फलके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी, "मी संबंधित रुग्णांवर उपचार करून ५ नोव्हेंबर रोजी त्यांना घरी सोडले होते. त्यामुळे या प्रकरणात माझा काहीही दोष नाही," अशी भूमिका मांडली.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी तातडीने घटनास्थळी दखल घेत नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान, या प्रकरणात नेमके काय घडले, रुग्णांची प्रकृती खालावण्यामागील कारण काय आणि उपचारांदरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणा झाला होता का, हे वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.