

परळी वैजनाथ: कौडगाव हुडा (ता. परळी) येथे रविवारी (दि.१७) मध्यरात्री १२ वाजता पासून पुराच्या पाण्यात चार युवक वाहून गेले. अडकलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा जीव वाचवण्यात यश आले असुन एकजण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
कौडगाव (ता. परळी) येथे काल मध्यरात्री जोरदार पावसामुळे नदीला मोठा पूर आला. नदीपात्रातून चारचाकीने जाणाऱ्या युवकांची गाडी या पाण्यात अडकली. गाडीतून खाली उतरलेले युवक पाण्यात वाहून गेले. अडकलेल्या चार तरुणांपैकी दोन जण झाडावर चढून बसले. एक पाण्याच्या प्रवाहात होता. तीन तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, बल्लाळ नावाचा एक तरुण अद्यापही बेपत्ता असुन, त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर पौळ या तरुणाला तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर राहुल पौळ आणि नवले नावाच्या युवकाला प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुखरूप वाचवण्यात आले. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक व नागरिकांचे मदतकार्य सुरु आहे. सध्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे शोधमोहीमेस अडथळे येत असुन, बल्लाळ याचा ठावठिकाणा लागलेला नाही.