

Parli fetal death case
परळी वैजनाथ : परळी शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीने संबंधित गित्ते हॉस्पिटलला भेट देत प्राथमिक माहिती घेतली.
गित्ते हाॅस्पिटलच्या डाॅ.कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती आता रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे, तपासण्या तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती तपासणार आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची बाजूही ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
समितीकडून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पुढील कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.