Beed Crime : शेतीच्या वादातून चुलत भावावर प्राणघातक हल्ला

मृत झाल्याचे समजून हल्लेखोर पती-पत्नीचे पलायन; जखमी शेतकरी बेशुद्धावस्थेत
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 
गौतम बचुटे

केज : शेतीच्या वादातून चुलत भावाला शेजाऱ्याच्या उसाच्या शेतात नेऊन काठी आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची, तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घातल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सोमनाथ भागवत घायाळ हे बेशुद्धावस्थेत असून, त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपी चुलत भाऊ आणि भावजईने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाघेबाभूळगाव येथील शेतकरी सोमनाथ घायाळ आणि त्यांचा चुलत भाऊ योगेश शिवाजी घायाळ यांच्यात जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू होता. या वादातून योगेश हा सोमनाथ यांना वारंवार दमदाटी करून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता, तसेच शिवीगाळ करीत होता.

५ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेपर्यंत सोमनाथ यांनी पत्नी निलावती आणि मुलगा शौर्य यांच्यासोबत शेतातील सोयाबीन काढले. त्यानंतर गावात जाऊन येतो, असे सांगून ते निघून गेले. याचदरम्यान, त्यांचा चुलत भाऊ योगेश आणि त्याची पत्नी वंदना यांनी सोमनाथ यांना एकटे गाठले आणि विशाल हावळे यांच्या उसाच्या शेतात नेले. तेथे शेतीच्या वादातून दोघांनी त्यांना काठी आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड घातला. या हल्ल्यात सोमनाथ गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. ते मृत झाल्याचे समजून आरोपी पती-पत्नी घटनास्थळावरून निघून गेले.

दरम्यान, सोमनाथ घरी परतले नसल्याने त्यांची पत्नी निलावती आणि आई मंडूबाई रात्री उशिरापर्यंत त्यांची वाट पाहत होत्या. रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सोमनाथ हे विशाल हावळे यांच्या उसाच्या शेतात जखमी अवस्थेत पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सोमनाथ यांच्या डोक्यातून, नाकातून आणि कानातून रक्तस्राव होत होता. ते रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडले होते.

त्यानंतर त्यांना इतरांच्या मदतीने नेकनूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी बीड येथील जीवनज्योत रुग्णालयात हलविण्यात आले. डोक्याला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने मेंदूला सूज आली असून, सोमनाथ यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या पाठीवर काठी आणि लोखंडी गजाने मारहाण केल्याच्या जखमाही आहेत.

या प्रकरणी १० ऑक्टोबर रोजी निलावती घायाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश घायाळ आणि वंदना घायाळ या दोघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news