

केज : वीज वितरण विभागात ठेकेदारी करीत असल्याचे सांगत डीपी बसवून देतो, असे सांगून एका तोतयाने शेतकऱ्यांची दोन लाखाची फसवणूक केली. हनुमंत शिंदे असे त्याचे नाव असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबतची माहिती अशी, हनुमंत शिंदे याने वीज वितरण कार्यालयाद्वारे शेतकऱ्यांना शेतात डीपी बसवून देण्याचे काम करीत असल्याचे साळेगाव येथील शेतकऱ्यांना सांगितले. शेतात स्वतंत्र डीपी बसविण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च येतो. शेतकऱ्यांनी वर्गणी करून दोन लाख रूपये जमा केल्यास तात्काळ डीपी बसवून देतो, असे त्याने सांगितले. अतिरिक्त दाबामुळे वारंवार वीज खंडित होत असल्याने तेथील शेतकरी त्रस्त होते. त्यामुळे डीपी बसविण्यासाठी हनुमंत शिंदे याला सात अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकूण २ लाख ५ हजार दिले. ही रक्कम शेतकऱ्यांनी जानेवारी २०२३ च्या दरम्यान दिली. सव्वा दोन वर्ष झाले, तरीही त्या ठेकेदाराने डीपी बसवून दिलेली नाही. त्यामुळे हे सर्व शेतकरी शिंदे याच्या घरी गेले. त्यावेळी तो गाव सोडून गेला असल्याची माहिती त्यांना मिळाली. शेतकऱ्यांनी त्याच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या फोनला त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधीक्षक, तहसीलदार यांना निवेदनाद्वारे या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.