

मनोज गव्हाणे
नेकनूर: शेतात पीक डोलू लागलं की वाटलं होतं चार पैसे हाती येतील, पण नशिबाने घात केला..." ही उद्विग्न प्रतिक्रिया आहे नेकनूर येथील तरुण शेतकरी जितेंद्र प्रभाकर शिंदे यांची. रक्ताचं पाणी करून आणि हजारो रुपये खर्च करून पिकवलेली मेथी कवडीमोलाने विकण्यापेक्षा, ती मातीत मिसळण्याचे पाऊल या शेतकऱ्याला उचलावे लागले आहे.
जितेंद्र शिंदे यांनी मोठ्या आशेने आपल्या दीड एकर क्षेत्रात मेथीची लागवड केली होती. बियाणे, पेरणी, महागडी औषधांची फवारणी आणि मजुरी असा एकूण ४० हजार रुपयांचा खर्च त्यांनी या पिकावर केला. पीक काढणीला आले तेव्हा बाजारात मेथीला केवळ ५ रुपये किलो असा निचांकी भाव मिळू लागला.
पाच रुपये किलो दराने मेथी विकली, तर ती शेतातून उपटण्यासाठी लागणाऱ्या मजुरांचा खर्चही निघणे अशक्य होते. कष्टाने पिकवलेला माल बाजारात नेऊन पदरचे पैसे घालवण्यापेक्षा, संतप्त झालेल्या शिंदे यांनी अखेर आपल्या दीड एकर उभ्या पिकात ट्रॅक्टरचा रोटर फिरवला. डोळ्यादेखत हिरवीगार मेथी मातीत मिसळताना पाहून उपस्थित ग्रामस्थांचेही डोळे पाणावले.
"बाजारभावाचा काहीच भरवसा राहिला नाही. ४० हजार खर्च करून हाताशी आलेल्या पिकाला आता काढायलाही परवडत नाही. पीक कसं पिकवायचं हे आमच्या हातात आहे, पण त्याला भाव मिळणं आमच्या नशिबात नाही."
— जितेंद्र शिंदे (पीडित तरुण शेतकरी)