Beed Drought | परळी वैजनाथ तालुक्यात जलसाठ्यांची गंभीर स्थिती; अनेक तलाव १० टक्क्यांखाली!

दैठणा तलावात सर्वात कमी ६.४० टक्के, तर वाण प्रकल्पात १९.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा
Beed Drought | परळी वैजनाथ तालुक्यात जलसाठ्यांची गंभीर स्थिती; अनेक तलाव १० टक्क्यांखाली !
Beed Drought | परळी वैजनाथ तालुक्यात जलसाठ्यांची गंभीर स्थिती; अनेक तलाव १० टक्क्यांखाली !
Published on: 
Updated on: 

प्रा.रविंद्र जोशी

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ तालुक्यातील विविध जलसाठ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा अत्यल्प राहिला असून, अनेक तलावांची पातळी १० टक्क्यांखाली गेली आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात १९.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, तो या जलसाठ्यांमध्ये सर्वाधिक आहे. त्याखालोखाल बोरना मध्यम प्रकल्पात १७ टक्के आणि कन्हेरवाडी ल.पा. तलावात १४.५१ टक्के पाणी शिल्लक आहे. मात्र, अनेक तलावांची स्थिती अधिक चिंताजनक आहे. गोपाळपूर ल.पा. तलावात ९ टक्के, मालेवाडी ल.पा. तलावात ८.४३ टक्के, चांदापूर ल.पा. तलावात ८.२४ टक्के, तर दैठणा सा. तलावात अवघा ६.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

परळी वैजनाथ तालुक्यातील जलसाठ्यांची सध्यस्थिती

* वाण मध्यम प्रकल्प - १९.७२%

•बोरणा मध्यम प्रकल्प - १७.००%

•कन्हेरवाडी ल.पा. तलाव- १४.५१%

•दौंडवाडी सा. तलाव - ११.२९%

•गोपाळपूर ल.पा. तलाव - ९.००%

•मालेवाडी ल.पा. तलाव - ८.४३%

•चांदापूर ल.पा. तलाव- ८.२४%

•दैठणा सा. तलाव- ६.४०%

पाण्याच्या काटेकोर नियोजनाची गरज

तालुक्यातील आठ नमूद जलसाठ्यांपैकी तीन जलसाठ्यांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा कमी, तर तीन जलसाठ्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षाही कमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि शेतीसाठीच्या पाण्याचा नियंत्रित वापर करणे आवश्यक ठरणार आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. परळी तालुक्यातील मुख्य जलस्त्रोत असलेल्या व परळी शहरासह तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारे नागापूर येथील वाण धरणातील पाणीसाठा वरचेवर कमी होत जाणार आहे.  नागापूर येथील 'वाण प्रकल्पाची  क्षमता १९.७१ द.ल.घ.मी. एवढी आहे.आता या प्रकल्पात १९ टक्के पाणी शिल्लक राहिलेले आहे. परळीकरांसाठी काळ खडतर आहे.शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पर्यायी व्यवस्था लावण्याची गरज. ......!

  परळी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या नागापूर येथील वाण धरणातील पाणीसाठा दिवसेनदिवस कमी होत चालला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था लावण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील जलसाठे कोरडे पडत चालले आहेत. परळी तालुक्यात व जवळ अन्य ठोस पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे परळीपासून जवळ परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील खडका बंधार्‍यातून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळावी यासाठी तातडीने  पाउले उचलणे गरजेचे बनले आहे.

खडका बंधार्‍यातून अगोदरपासूनच आहे पाईप लाईन. .....!

     खडका बंधार्‍यातून परळी येथील विज निर्मिती केंद्रापर्यंत पाणी आणण्याची सोय आहे. 2015 साली पडलेल्या दुष्काळात विज निर्मिती केंद्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांना नागापूर येथील वाण धरणातून पिण्याचे पाणी पुरविण्यात आले होते. त्यामुळे धरणापासून विज निर्मिती केंद्रातील पाणी साठवण हौदापर्यंत पाईप लाईन आहे. केवळ काही वेळात व शुल्लक खर्चात खडका बंधार्‍याचे पाणी परळीच्या पाणी पुरवठा करणार्‍या पाईप लाईनला जोडता येऊ शकते. ही पाईप लाईन जोडल्यास परळी शहराला दररोज पाणी पुरवठा केला जाऊ शकतो.

माजलगाव पाटबंधारे प्रकल्पांतर्गत सहा मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी तीन मध्यम प्रकल्प परळी तालुक्यात आहेत. नागापूर येथील वाण, बोधेगाव येथील मध्यम प्रकल्प व बोरणा मध्यम प्रकल्प या सर्व प्रकल्पातील पाणीसाठा कमी कमी होत चालला आहे. माजलगाव पाटबंधारे प्रकल्पांतर्गत जवळपास सर्वच प्रकल्पात. २० टक्क्यांआत साठा शिल्लक आहे. पाणी वाचवणे याशिवाय आता दुसरा पर्याय नाही.

- जी.आर. आदमानकर (कार्यकारी अभियंता, माजलगाव पाटबंधारे प्रकल्प )

आज दुष्काळाचे संकट आपल्या दारात आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. आज वाचवलेला थेंबच उद्याची तहान भागवेल. त्यामुळे नळाला तोटी लावा.पाण्याचा अपव्यय टाळा. कुठेही लिकेज आढळल्यास तात्काळ कळवा. ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.एकजुटीने संकल्प करूया-पाणी वाचवू परळीचे भविष्य वाचवूया.

- सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी (नगराध्यक्षा, परळी वैजनाथ.)

परळी वैजनाथ शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या वाण प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, नळांना तोट्या लावाव्यात तसेच कुठेही पाणीगळती किंवा तांत्रिक अडचण आढळल्यास तात्काळ नगर परिषदेला कळवावे.

- सौ. जयश्री रविंद्र गित्ते (पाणीपुरवठा सभापती न.प.परळी वैजनाथ. )

पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरात बांधकामे टाळावीत

दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळात उद्भवू शकणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सध्या नवीन बांधकामे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, सद्यस्थितीत पाण्याची उपलब्धता मर्यादित असताना आगामी काळात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

- पवन मुंडे (बांधकाम सभापती, न.प.परळी वैजनाथ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news