Beed News : डिलिमिटेशनमुळे बीड जिल्ह्याला मिळणार दुसरा लोकसभा मतदारसंघ?

अंबाजोगाई स्वतंत्र लोकसभा मतदारसंघाच्या चर्चेला वेग; स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीलाही मिळणार बळ?
Delimitation
DelimitationPudhari
Published on: 
Updated on: 
गोविंद खरटमोल

अंबाजोगाई : देशभरात सध्या मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या संभाव्य प्रक्रियेबाबत चर्चा सुरू आहे. या प्रक्रियेमुळे बीड जिल्ह्याच्या राजकीय नकाशात बदल होऊन जिल्ह्याला दुसरा लोकसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अंबाजोगाई, केज आणि परळी या भागांचा समावेश असलेला स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यास अंबाजोगाईच्या विकासाला नवी दिशा मिळण्याबरोबरच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीलाही बळ मिळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बीड जिल्हा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे. अंबाजोगाई, परळी, केज, धारूर आणि वडवणी या भागांतील नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी बीड येथे जावे लागते. यासाठी मोठा प्रवास करावा लागत असल्याने वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे अंबाजोगाई येथे स्वतंत्र लोकसभा मतदारसंघासह स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाल्यास स्थानिक नागरिकांच्या अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

अंबाजोगाई हे मराठवाड्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर, वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, विविध शासकीय कार्यालये तसेच अभियांत्रिकी, फार्मसी, अध्यापक आणि कृषी महाविद्यालयांसह अनेक शैक्षणिक संस्था येथे कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील या योगदानामुळे अंबाजोगाईला 'शिक्षणाची पंढरी' म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या शहराला स्वतंत्र प्रशासकीय आणि राजकीय ओळख मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

प्रस्तावित डिलिमिटेशन प्रक्रियेत लोकसंख्येसह निर्धारित निकषांच्या आधारे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई-केज-परळी परिसराचा समावेश असलेला स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ निर्माण होण्याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. असा मतदारसंघ निर्माण झाल्यास अंबाजोगाई परिसरातील स्थानिक प्रश्नांना संसदेत थेट मांडण्यासाठी स्वतंत्र लोकप्रतिनिधी मिळू शकतो, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

सध्या अंबाजोगाईचा समावेश बीड लोकसभा मतदारसंघात आहे. मात्र, भौगोलिक अंतर आणि स्थानिक प्रश्नांना मिळणारे प्राधान्य याबाबत काही नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येते. अंबाजोगाईला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा आणि स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ मिळाल्यास रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक विकासासारख्या प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, असे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.

स्वतंत्र लोकसभा मतदारसंघाच्या चर्चेबरोबरच अंबाजोगाईच्या स्वतंत्र जिल्ह्याचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्ह्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शासनदरबारी ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. डिलिमिटेशनच्या संभाव्य प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या संधींचा विचार करून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, डिलिमिटेशननंतर बीड जिल्ह्याला खरोखरच दुसरा लोकसभा मतदारसंघ मिळणार का? अंबाजोगाई-केज-परळी असा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात येणार का? तसेच अंबाजोगाईच्या स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीला यामुळे चालना मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होतील. त्यामुळे या संभाव्य राजकीय आणि प्रशासकीय बदलांकडे अंबाजोगाईकरांसह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.