Beed | बँकांबरोबरच ग्राहकही हैराण; उपाययोजनांची गरज

बँकांबरोबरच ग्राहकही हैराण; उपाययोजनांची गरज
Beed
Beed news file photo
Published on
Updated on

उदय नागरगोजे

बीड ऑनलाईन व्यवहार वाढत असले तरी अनेकदा रोख रकमेची गरज पडते. त्यातही मोठी रक्कम हवी असेल तर किमान पाचशेच्या नोटा हव्या असतात, परंतु गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. यातही पाचशे आणि दोनशेच्या नोटाच बँकांमध्ये उपलब्ध नसल्याने बँकेचे अधिकारी आणि ग्राहकही हैराण झाले आहेत.या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी आता केली जात आहे.

बीड जिल्ह्यात नागपूर येथील रिझर्व बँकेच्या कार्यालयाकडून रोख रक्कम पुरवली जाते. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून त्या ठिकाणाहून रोख रक्कम मिळण्यात अडचणी येत आहेत. बीड शहराचा विचार केल्यास राजुरी वेस परिसरात असलेल्या एसबीआयच्या शाखेतून बँकांना रोख रक्कम दिली जाते, परंतु त्या ठिकाणीच कॅश उपलब्ध नसल्याने बीडमध्ये अडचण जाणवत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये देखील आहे.

यामुळे मोठ्या स्वरुपात रोख रक्कमेची मागणी केल्यास बँक व्यवस्थापनाकडून संबंधीत ग्राहकास ऑनलाईन व्यवहाराविषयी विचारणा केली जात आहे. अथवा एकूण रकमेच्या काही मयदित रोख रक्कम दिली जात आहे. अनेक बँका तर त्यांच्या इतर ठिकाणच्या शाखांमधून रोख रक्कम मिळवत व्यवहार सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ही समस्या जाणवत असल्याने मोठ्या स्वरुपातील रोख रकमेचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून अग्रणी बँकेच्या कार्यालयाला ई मेल पाठवण्यात आला आहे तसेच इतर बँकांकडून रोख रक्कम वितरण करणाऱ्या बँकांकडे याबाबत पाठपुरावा केला जात असला तरी परिस्थिती मात्र जैसे थे आहे. आता जिल्ह्यात पुरेशी रोख रक्कम कधी उपलब्ध होणार, हा प्रश्न कायम आहे.

उपाययोजना व्हाव्यात : आदित्य सारडा

बैंक शाखांचे व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी रोख रकमेच्या अडचणी गेल्या आठ दिवसांपासून येत आहे. ग्राहकाकडून मोठी रक्कम रोख स्वरुपात मागणी केली गेल्यास ती पूर्ण करण्यास वेळ लागत आहे. आम्हाला एसबीआयच्या ज्या शाखेतून रोख रक्कम मिळते, त्या ठिकाणी अनेकदा मागणी नोंदवली, परंतु मागणीप्रमाणे रोख रक्कम मिळालेली नाही. यामुळे संभाजीनगर, जालना या ठिकाणच्या आमच्या बँकेच्या शाखेतून शक्य होईल तेवढी रोख रक्कम मागवली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करून सर्वच बँकांना रोख रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी व्यक्त केली.

बैंक अधिकाऱ्यांना सूचना करणार : विवेक जॉन्सन

बीड जिल्ह्यात रोख रकमेचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यानुसार मी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली आहे. तसेच यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात, जवळपासच्या कुठल्या क्षेत्रामधून बँकांना कॅश उपलब्ध करता येऊ शकते, या सर्व बाबींचा विचार करून उपाययोजना करणार आहोत. गरज पडल्यास बीडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील याबाबत कल्पना देऊन उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन मागवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.

मी माझे खाते असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मोंढा शाखेकडे रोख रक्कम मिळण्यासाठीची प्रक्रिया बुधवारी केली होती. परंतु मला तेव्हढी रक्कम मिळू शकणार नाही, अशी माहिती बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आली. यावर बँकेकडून ऑनलाईनचा पर्याय सांगण्यात आला किंवा पूर्ण रक्कम रोख स्वरुपात हवी असेल तर काही कालावधी थांबावे लागेल असे सांगण्यात आले. माझा व्यवहार रोख स्वरुपात असल्याने मला रकमेची गरज आहे, परंतु ती मिळतच नसल्याने अडचणी येत आहेत.

-योगेश शेळके, वांगी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news