

केज : नृत्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने संभाजीनगर येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला वाम मार्गाला लावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कला केंद्र चालवणाऱ्या महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुलीला सुधारगृहातून सोडवून आणल्याचा आणि नंतर तिचे अपहरण केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. याप्रकरणी संभाजीनगर येथून गुन्हा वर्ग झाल्यानंतर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची माहिती अशी, संभाजीनगर जिल्ह्यातील बीबीच्या मकबऱ्या जवळ रहात असलेली एक परित्यक्ता महिला आपल्या १४ वर्षीय मुलीबरोबर राहत होती. आई धुणी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मुलीला नृत्याची आवड असल्याने, तिने आपल्या मैत्रिणीसोबत केज तालुक्यातील एका कला केंद्रात नेहा बिडकर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. काही दिवसांपूर्वी या कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी ही अल्पवयीन मुलगी आढळून आल्याने पोलिसांनी तिची रवानगी बाल स्वधारगृहात केली. यादरम्यान कला केंद्र चालवणाऱ्या नेहा बिडकर हिने मुलीच्या वयाचे बनावट पुरावे तयार करून ती सज्ञान असल्याचे सांगत बाल स्वधारगृहातून तिचा ताबा मिळवला.
मुलीची आई तिला भेटायला कला केंद्रावर गेली असता, मुलीने घरी परत येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, नेहा बिडकर हिने सात हजार रुपयांची मागणी केली आणि पैसे दिल्याशिवाय मुलीला सोडणार नाही, असे सांगितले. पैसे नसल्याने ती मुलीला परत घेऊन गेली नाही. दरम्यान ७ ऑगस्टला पीडित मुलीने आईला फोन करून सांगितले की, नेहा बिडकर तिला घरी येऊ देत नसून हैदराबादला घेऊन जात आहे. यानंतर घाबरलेल्या आईने तात्काळ संभाजीनगर पोलिसांत धाव नेहा बिडकर हिने आपल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. आपल्या मुलीला अनैतिक व्यवसायात ढकलण्याचा तिचा डाव असल्याचेही आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीला एकटीला परगावी कला केंद्रात ठेवण्यामागे आईची नेमकी काय भूमिका होती? तसेच भाड्याने गाडी करून मुलीला भेटायला येणाऱ्या आईची आर्थिक परिस्थिती आणि एकूणच तिची भूमिका देखील संशयास्पद वाटते.
स्वधारगृहाच्या अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात न देता बनावट कागदपत्रांच्या आधारे नेहा बिडकर या महिलेच्या ताब्यात मुलीला कसे दिले? या प्रक्रियेत स्वधारगृहाचे अधिकारी सामील होते का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
केज तालुक्यातील कला केंद्रे यापूर्वीही वादात सापडली आहेत. तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ७ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री कला केंद्रांवर छापे टाकून ३६ जणांविरुद्ध पोक्सो, पिटा कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले होते.