आष्टी : तालुक्यातील आष्टी-डोईठाण रस्त्यावरील हॉटेल कार्तिकजवळ शनिवारी दुपारी भररस्त्यात एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार दोन चोरांनी दिवसाढवळ्या ओरबडून नेल्याची धक्कादायक घटना घडली. अशाच प्रकारची घटना आष्टी शहरातच भर दिवसा घडली होती. ती ताजी असतानाच पुन्हा एकदा त्याच प्रकारची घटना घडल्याने परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, घटनेच्या वेळी संपर्क करूनही पोलिसांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांचा धाक संपला
शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास एक महिला आष्टी- डोईठाण रस्त्यावरील हॉटेल कार्तिक परिसराजवळ असलेल्या शेतामध्ये काम करत होती. याच वेळी एका दुचाकीवरून दोन अज्ञात इसम तिथे आले. परिस्थितीचा अंदाज घेत या भामट्यांनी थेट महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओरबडले आणि दुचाकीवरून अत्यंत वेगाने पळ काढला.महिलेने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला.काही सतर्क नागरिकांनी तात्काळ दुचाकीवरून त्या चोरांचा थरारक पाठलाग केला. मात्र, चोरटे सुसाट वेगाने आष्टीच्या दिशेने किंवा ग्रामीण भागातील रस्त्याने पसार होण्यात यशस्वी झाले.
नागरिकांची धावपळ, पोलीस उदासीन
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.जागरूक नागरिकांनी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच विशेष शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना एकामागून एक फोन केले. मात्र, अत्यंत खेदाची बाब म्हणजे एकाही पोलीस अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने या फोनला 'रिस्पॉन्स' दिला नाही. पोलिसांच्या या उदासीन आणि ढिम्म कारभारामुळे घटनास्थळावरील नागरिकांमध्ये कमालीचा रोष पाहायला मिळाला.
सर्व सामान्यांची सुरक्षा कोणाच्या भरवशावर?
"दिवसाढवळ्या महिलांवर असे हल्ले होत असतील आणि संकटसमयी फोन करूनही पोलीस फोन उचलणार नसतील, तर जनतेने सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे?" असा संतप्त सवाल आता डोईठाण परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत. या भागात पोलिसांची गस्त वाढवावी आणि संबंधित चोरांचा तात्काळ सुगावा लावून त्यांना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.