

केज : सोशल मीडियाचा वापर करून महिलांची छेड काढण्याचे प्रमाण वाढत असतानाच, केज शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ३१ वर्षीय महिलेला इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ पाठवून तिची बदनामी केल्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका तरुणाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज शहरातील पीडित महिलेला २८ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत ओंकार सुंदर भंडारे (रा. कळंब, जि. धाराशिव) याने सातत्याने त्रास दिला. आरोपीने स्वतःच्या विविध इन्स्टाग्राम अकाऊंटवरून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील व्हिडिओ पाठवले.
महिलेने आपली बदनामी थांबवण्यासाठी आरोपीच्या मोबाईलवर संपर्क साधून त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने सुधारण्याऐवजी उलट पीडितेला अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर या छळाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी ओंकार भंडारे याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ८९, ३५६(२), ३५१(१), ३५२ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नागरगोजे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.