

गौतम बचुटे
केज : बीड जिल्ह्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन गेल्या ११ महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील संभाजीनगर भागात राहणारा विकास लक्ष्मण खाडे याची केज तालुक्यातील पीडित महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेऊन विकासने पीडितेला लस्सीतून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. हे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने मे २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत पीडितेवर वारंवार अत्याचार केला. आरोपीने पीडितेला कळंब, केज येथील लॉज तसेच पीडितेच्या गावाकडील ठिकाणी अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने युसूफवडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी विकास लक्ष्मण खाडे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६४(२) (एम) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला कळंब येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. आरोपीला केज न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे करत आहेत.