

माजलगाव : तालुक्यातील तालखेड येथे सासू-सासरा नसल्यामुळे सासरवाडीतच राहत असलेल्या ३३ वर्षीय युवकाला मारहाण करून त्यास तिक्ष्ण हत्याराने गळा , पोट व डोक्याला मारल्याने त्याचा मृत्यू झाला. जुन्या वादातून खून झाल्याची चर्चा तालखेड परिसरात दिसून आली.
विकास दत्तात्रय वाघमोडे रा.किट्टी आडगाव याचा प्रेमविवाह काही वर्षांपूर्वी अरुण नारायण राऊत गुरव यांच्या मुलीशी झाला होता दरम्यान त्याचे सासू-सासरे वारल्याने विकास वाघमोडे आपल्या सासरी मागील पाच वर्षापासून राहुन त्यांची शेती पाहत असे. दररोजच्या प्रमाणे तो रविवारी सकाळी घरातून शेतात जाऊन येतो म्हणून गेला होता परंतु तो रात्री उशिरापर्यंत परत आला नाही यामुळे त्याची पत्नी व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही.
सोमवारी सकाळपासून विकास चा शोध सुरूच होता त्यावेळी तालखेड जवळ असलेल्या खंडोबा वड्या पाशी त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर ही बाब ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आली त्यानंतर पोलिसांनी येऊन घटनेची माहिती घेत पंचनामा केला. यावेळी मयत विकास याच्या शरीरावर विविध ठिकाणी तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे आढळून आले यामुळे हा घात - पातच असल्याचा संशय पोलिसांना आला असून पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.
दरम्यान जुन्या वादातून हा प्रकार झाला असल्याची चर्चा तालखेड परिसरात दिसून आली.याबाबत रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिसात कसल्याच प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.