

केज: केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुर्डी फाटा येथे अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ११ हजार ७५० रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.
युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केज कळंब महामार्गावरील सुर्डी फाटा येथे असलेल्या हॉटेल वेलकममध्ये सार्थक संजय घुले (रा. कल्पना नगर, कळंब, जि. धाराशिव) हे विनापरवाना देशी व विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि. ४ जुलै रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता पोलिसांनी संबंधित हॉटेलवर धाड टाकली.
या कारवाईत किंगफिशर, क्लासिक गोल्ड, काच बर्ग, टँगो पंच तसेच देशी दारूचा अवैध साठा आढळून आला. पोलिसांनी एकूण ११ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जीवन कारले यांच्या फिर्यादीवरून सार्थक संजय घुले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार बिक्कड करीत आहेत.
दरम्यान, युसुफवडगाव पोलिस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, त्यांच्या या धाडसी पावलाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.