

केज : प्रवाशी म्हणून कार मध्ये बसलेल्या दोघांनी ड्रायवरच्या गाळ्यातील अडीच तोळे सोन्याची चैन हिसकावून घेत रोख ५ हजार रु. घेऊन ड्रायव्हरच्या गळ्यावर व मानेवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, ऋषीकेश अंबादास उत्तेकर वय (२६ वर्षे) हा टॅक्सी ड्रायव्हर त्याची मारूती डिझायर ही कार क्र. (एम एच- १२/एस एफ- ६७८६) उबेर कंपनीला नोंदणी केलेली आहे. दि. ६ सप्टेंबर रोजी पाहटे ४:०० वा. च्या सुमारास ऋषिकेश उतेकर हा त्याच्या गाडीत पुणे जिल्ह्यातील चाकण येथून दोन प्रवाशांना घेऊन बीड जिल्ह्यात अंबाजोगाईकडे येत होता.
पहाटे ४:०० च्या सुमारास केज मांजरसुंबा महामार्ग क्र ५४८- डी वरील केज तालुक्यातील बरड फाटा येथील एच पी पेट्रोल पंपा जवळ आले असता त्याच गाडीतील पाठीमागील सिटवर बसलेल्या प्रवाशांपैकी एकाने अचानक पाठी मागून ड्रायव्हर ऋषिकेश उतेकर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली. या अचानक झालेल्या घटनेने याने ऋषिकेश उतेकर याने गाडीचे ब्रेक मारुन थांबविली. मात्र तेवढ्या वेळेत त्याच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चेन तोडून घेतली. ड्रायव्हर ऋषिकेश उतेकर याने गाडी थांबवून आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या पैकी एकाने चाकुने ड्रायव्हर ऋषिकेश उतेकर याच्या डोळ्यावर, चेहऱ्यावर, मानेवर वार केले. तसेच गाडीत ठेवलेले पाच हजार रुपये काढून घेतले आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
त्या नंतर ऋषिकेश उतेकर याला ॲम्ब्युलन्सने नेकनुर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून त्यांना पुढीलु उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्याय येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ऋषिकेश उतेकर यांच्या तक्रारी वरून दोन अज्ञात प्रवाशा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर हे तपास करीत आहेत.