

गौतम बचुटे
केज : अवैध्यरीत्या मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करीत असलेले टिपर स्वतः तहसीलदारांनी अडवून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून चौकशी सुरू असताना चालकाने टिपर पळवून नेवून त्यातील मुरुम एका ठिकाणी टाकून पळून गेला. अवैध्य वाळू उपसा आणि गौणखनिज यांची तस्करी करणाऱ्या विरुद्ध कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे.
या बाबतची माहिती अशी की, २४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार राकेश गिड्डे यांनी कळंब चौकात अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक करीत असलेले अशोक लेलँड कंपनीचे टिपर क्र. (एम एच-४४/यू-४४६७) हे अडवून चौकशी करण्यासाठी तहसीलच्या आवारात आणले. त्यानंतर तहसीलदार राकेश गिड्डे यांनी मंडळ अधिकारी लक्ष्मण ढाकणे व राम मगर यांना मुरुम उत्खननाचा व वाहतुकीच्या परवान्या संदर्भात चौकशी करून टिप्परची चावी घेण्यासाठी आदेश दिले. मंडळ अधिकारी लक्ष्मण ढाकणे व राम मगर टिपर चालक अशोक कदम याने अचानक टिपर सुरू करून भरधाव वेगात तहसील कार्यालयातून घेऊन पळवून गेला. दरम्यान मंडळ अधिकारी लक्ष्मण ढाकणे व राम मगर यांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने बीड रोड लगतच्या एसटी बस स्थानकाच्या नियोजित जागेत टिपर मधील सुमारे १.२५ ब्रास मुरुम टाकून पळून गेला.
तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आदेशाने महसूल मंडळ अधिकारी नितीन भालेराव यांच्या तक्रारीवरून टिपर चालक किशोर कदम याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु र नं ८६/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२) ६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे हे करीत आहेत.
दोन महिन्यातील दुसरी घटना
या पूर्वी देखील २५ डिसेंबर २०२५ रोजी अवैध्य रीत्या मुरूमाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदारांनी कारवाई करून ताब्यात घेतले होते. दरम्यान ते ट्रॅक्टर पळून नेले होते. यानंतर अवघ्या दोनच महिन्यात ही दुसरी घटना घडली आहे.