

टाकरवन : तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीत भाविकांची वाहतूक करणारी होडी पलटून दोन महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना १० जून रोजी सकाळी घडली होती. या दुर्घटनेप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी रविवारी (दि.१४) दोघांविरुद्ध क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासानिमित्त यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना 'गंगेत ये-जा' करण्यासाठी होडी वाहतूक सुरू होती. परंतु या होडीत क्षमतेपेक्षा अधिक लोकांना बसवले जात होते.
१० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात संबंधित होडी चालकाने त्यांच्या होडीत निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना बसवून वाहतूक केली. होडीमध्ये अधिक प्रवासी घेतल्यास अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता माहिती असूनही निष्काळजीपणे वाहतूक केली होती. दरम्यान, प्रवाशांनी भरलेली होडी नदीपात्रात पलटल्याने अनेक भाविक पाण्यात पडले. या दुर्घटनेत प्रमिला शेषराव राठोड (वय ५५, रा.बीबी,ता. लोणार, जि.बुलढाणा)आणि कांता ज्ञानदेव आंधळे(वय ५३,रा. कुंभेफळ, ता.सिंदखेड,जि. बुलढाणा) या दोन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर काही भाविक जखमी झाले.
प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या नोटिसा व सुरक्षाविषयक सूचनांचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी उद्धव बळीराम गायकवाड व दुर्गा उद्धव गायकवाड(रा.चागतपुरी,ता. परतूर,जि.जालना)यांच्याविरुद्ध फिर्यादी नामदेव राजाराम कोकाटे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत पुरुषोत्तमपुरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर पुरुषोत्तमपुरी यात्रेदरम्यान नदीतील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करत गंगेत होडीची वाहतूक बंद केली आहे.