

गौतम बचुटे
केज : केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक (आयपीएस) व्यंकटराम यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत ८ लाख १४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे ऑनलाइन जुगार आणि गेम खेळणाऱ्यांविरुद्ध पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
गुरुवारी (दि. २५) रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांना गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाली की, केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लोकांना जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून, विनापरवाना बेकायदेशीररीत्या 'लोटस ३६५' (Lotus 365) ॲपवर विविध खेळांवर ऑनलाइन जुगार खेळवत आहेत.
मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस कॉन्स्टेबल धोंडीराम योगीराज मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल क्षीरसागर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मंदे, मिसबा इनामदार, मल्लिकार्जुन माने, जरगर आणि मयूर टकले यांच्या पथकाने छापा टाकून धडक कारवाई केली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी अनंत नवनाथ खंदारे (वय २३ वर्षे, रा. कारेगव्हाण, ता. जि. बीड), अक्षय अनिल गायकवाड (वय २० वर्षे, रा. सिंहगड रोड, हिंगणे खुर्द, माधन नगर, गणेश कॉलनी, घर क्र. ३०, जि. पुणे), अनिल कबीर सानप (वय २३ वर्षे, रा. सानपवाडी, ता. जि. बीड), आसाराम बळीराम केकाण (वय २५ वर्षे, रा. दरडवाडी, ता. केज, जि. बीड), गणेश लक्ष्मण खंदारे (वय २२ वर्षे, रा. कारेगव्हाण, ता. जि. बीड), हर्षल मनोहर खंडारे (वय २७ वर्षे, रा. कौंडण्यपूर, ता. तिवसा, जि. अमरावती), सुशील दत्तात्रय मुंडे (वय २४ वर्षे, रा. कोठारबन, ता. वडवणी, जि. बीड) आणि विशाल उत्तम बारवाळ (वय २० वर्षे, रा. पिंप्री एलोरा, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) या आठ जणांना ताब्यात घेतले.
पोलीस पथकाने या आरोपींकडून ३७ मोबाईल आणि ४ मोटरसायकली, असा एकूण ८ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३९७/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.