

केज : घरात लाईट नसल्यामुळे दरवाजा उघडा ठेवून दोन मुलींसह झोपलेल्या एका विवाहित महिलेचा मध्यरात्री घरात घुसून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना केज शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या घरातील दोन महिलांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ मे रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास केज शहरातील एका उपनगरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे केज शहरातील एका उपनगरात राहणारी विवाहित महिला आपल्या दोन मुलींसह घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून झोपली होती. हीच संधी साधून रात्री पावणेबाराच्या सुमारास दीपक वैजनाथ लांडगे याने घरात प्रवेश केला आणि वाईट हेतूने पीडित महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केला.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिला आरोपीच्या कृत्याचा जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. मात्र, तिथे दीपक लांडगे याच्या कुटुंबातील दोन महिलांनी पीडितेलाच शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
अखेर पीडित महिलेने केज पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून २४ मे रोजी आरोपी दीपक लांडगे याच्यासह त्याच्या कुटुंबातील दोन महिलांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.