

बीड : थायलंडमध्ये अधिकच्या पगारी नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांसह तब्बल ८०० भारतीयांना म्यानमार-थायलंड सीमेवरील 'गोल्डन ट्रँगल' मधील अज्ञात छावणीत ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर माफियांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी बीड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.
केज तालुक्यातील एका २४ वर्षीय तरुणाला फेसबुकवरील जाहिरातीद्वारे बँकॉक येथे तब्बल ७० हजार रुपये महिना पगाराचे आमिष दाखवण्यात आले होते. त्या नोकरीसाठी ४ जून रोजी तो पुण्याहून बँकॉकमध्ये पोहोचला, मात्र तिथून त्याला बळजबरीने म्यानमार सीमेवरील एका जंगलातील छावणीत नेण्यात आले. तिथे त्याचे पासपोर्ट व कागदपत्रे हिरावून घेण्यात आली आहेत. या नरकयातनेमध्ये तरुणांना एका लहान खोलीत कोंडून बंदुकीच्या धाकावर १८-१८ तास ऑनलाईन फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले जात आहे. काम करण्यास नकार दिल्यास विजेचे शॉक देणे आणि अमानुष मारहाण केली जाते. या पीडित तरुणाने लपतछपत पत्नीला फोन करून माझा जीव धोक्यात असून तीन जणांना डोळ्यादेखत मारून टाकले अशी माहिती समोर आल्यानंतर हा आंतरराष्ट्रीय तस्करीचा कट उघड झाला. बीड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील तपासाला गती दिली आहे.