

अंबाजोगाई :- येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात त्वचा रोग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मंदार उमेश दाभाडे (वय २८) या विद्यार्थ्याने आज पहाटे राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळचा पुणे येथील रहिवासी असलेला मंदार हा या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मंदार हा अंबाजोगाई शहराच्या चनई रोडवरील संत रविदास नगर भागातील सातपुते यांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होता. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी कालच दि ५ रोजी आपल्या घरमालकाला फोन पे द्वारे तीन हजार रुपये घरभाडे पाठवले होते. त्यानंतर पहाटे त्यांच्या भावाला आपल्या मोबाईलचा पासवर्ड संदेशाद्वारे पाठवला होता. त्यानंतर आपण राहात असलेल्या खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंदारने गळफास घेण्यापूर्वी तोंडावर रुमाल बांधला असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस दलही तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यासोबतच फॉरेन्सिक लॅबची टीम देखील पुराव्यांच्या संकलनासाठी पाचारण करण्यात आली असून सदर टीम घटनास्थळी पाहणी करत आहे. मंदारसारख्या अत्यंत मनमिळाऊ, होतकरू विद्यार्थ्याने ऐन उमेदीच्या काळात हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र मंदारच्या या टोकाच्या पावलाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मंदारने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच .