

बीड : ओंकार सातपुते या तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात जामिनावर असलेल्या दादा खिंडकर याने त्याचा भाऊ समाधान खिंडकर याला 10 जून रोजी सायंकाळी बीड पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून आता या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसाजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा साडू असलेला दादा खिंडकर हा गेले वर्षभरापासून कारागृहात होता. पिंपळनेर पोलिसांच्या हद्दीत ओंकार सातपुते या युवकाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात दादा खिंडकर याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
त्याच गुन्ह्यात तो गेल्या वर्षभर कारागृहात होता. काही महिन्यापूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यापासून सातत्याने चर्चेत असून यादरम्यान बुधवारी सायंकाळी तो पंचायत समितीच्या परिसरात आपल्या मित्रांसमवेत थांबला होता. यावेळी त्या ठिकाणी समाधान खिंडकर हा त्याचाच भाऊ उपस्थित होता.
या दोघां भावांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या कारणावरून वाद होते त्याच वादातून दादा खिंडकर याने समाधान खिंडकर याला लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.