

माजलगाव : शहरातील चोरयांचे सत्र थांबत नसून गजानन नगर रोडवर असलेल्या श्रीकृष्ण ट्रेडर्स या होलसेल दुकानाचे शटर वाकून चोरट्याने आतील दहा लाख रुपये किमतीचे सिगारेटचे आठ बॉक्स व नगदी 75 हजार रुपये लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चार चोरट्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गजानन रोडवर श्रीकांत श्रीनिवास रुद्रवार यांचे श्रीकृष्ण ट्रेडर्स हे होलसेल दुकान असून ते नेहमीप्रमाणे रविवारी रात्री लवकर दुकान बंद करून गेले होते. सोमवारी त्यांना सकाळी सात वाजता शेजारील दुकानदाराने फोन करून सांगितले की तुमचे दुकान फोडले असून तुम्ही तात्काळ इकडे या, यावर ते दुकान कडे गेले असता त्यांना दुकानचे शटर वाकलेले दिसले.
आत प्रवेश केला असता दुकानातील सिगरेटचे दहा लाख किमतीचे आठ बॉक्स व गल्ल्यातील नगदी 75 हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. तर दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर ही चोरट्याने तोडून नेल्याचे दिसले. यावरून त्यांनी बाजूला असलेल्या बँकेचे सीसीटीव्ही चेक केले असता दुकान समोर सकाळी पाच वाजता स्विफ्ट गाडीत आलेल्या चार चोरट्यांनी सिगरेट बॉक्स पळवल्याचे दिसून आले.
यावेळी त्यांनी तात्काळ शहर पोलीसांशी संपर्क केला असता शहर पोलीस आणि घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीची पाहणी करत शहरात अनेक ठिकाणी या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. याप्रकरणी दुकान मालक श्रीकांत श्रीनिवास रुद्रवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.