

बीड : बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या बारावी परीक्षा दरम्यान कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासणाऱ्या केंद्रप्रमुखासह 17 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीडच्या चौसाळा येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात असलेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉपी केली जात असल्याचा एक ड्रोन व्हिडिओ समोर आला होता.
याबरोबरच याच परीक्षा केंद्रात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केंद्रप्रमुखासह इतर काही शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे निदर्शनास आले होते. या सर्व प्रकाराची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. तसेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार आता बीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांच्या तक्रारीवरून केंद्र संचालकासह 17 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेकनूर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान यापूर्वी अनेकदा कॉपीची प्रकरणे समोर आली होती, परंतु थेट केंद्र संचालक व शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे शिक्षणप्रेमींनी सांगितले.
या व्यक्तिंवर गुन्हा दाखल
केंद्र संचालक संजय घाडगे, भागवत कुरुंद, गोरोबा बचूठे, राजश्री माने, वसीम शेख, आर.जी करडकर, एस.आर. दांगट, विनायक वझे, ताराचंद राठोड, ए.बी. आघाव, पि.के. रसाळ, जी.बी. चक्रे, सी.एस. मुळीक, बी.बी. सुपेकर, यू .डी.उगले, एस. एस. गवई, बालासाहेब पवार या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.