

Buffalo electrocuted in Beed
केज : केज तालुक्यातील साळेगाव येथे वादळाने विद्युत वाहक तार म्हशीच्या अंगावर तुटून पडल्याने म्हैस जागीच दगावली.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथे शेतकरी सखाराम त्र्यंबक गित्ते हे दि. १९ मे रोजी पाळीव म्हैस घरी घेऊन जात असताना सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने विजेच्या खांबा वरील विद्युत वाहक तार तुटून त्यांच्या म्हशीच्या अंगावर पडली.
यात म्हैस जागीच ठार झाली. तर म्हशीचा कासरा हातात असलेले शेतकरी सखाराम गित्ते यांनाही सौम्य झटका बसला. सौम्य झटका बसताच त्यांनी हातातील कासरा सोडून देऊन ते बाजूला झाले. यामुळे अनर्थ टळला. या अपघातात शेतकऱ्याचे सुमारे ७५ हजार रु. चे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी सखाराम गित्ते यांनी पोलीस आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसह पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
म्हैस आणि कासरा हातात घेतलेले शेतकरी सखाराम गित्ते यांच्या अवघे सहा ते सात फुटाचे अंतर होते. कदाचित त्यांनी जर हातातील कासरा सोडला नसता तर अनर्थ घडला असता.