

केज:- चौकशी अहवाल तुमच्या बाजूने देतो असे म्हणून २० हजार रु. ची लाच प्रत्यक्ष शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने ते पैसे स्वतःकडे न घेता सोबत असलेल्या एका सहशिक्षकडे देण्याचा अंगुलीनिर्देश केला. त्या शिक्षकाने पैसे घेऊन पँटच्या खिशात ठेवताच पैसे देणाऱ्या शिक्षकाने त्याच्या गळ्यातील रुमाल डाव्या हातात घेऊन इशारा करताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दोघांना रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे व सहशिक्षक जयगुरु गिरी या दोघांना अटक करण्यात आले आहे.
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजाभाऊ कदम यांना तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी ऑगस्ट २०२६ मध्ये ३० जुलै २०२६ अन्वये २.० शालार्थ वेतन प्रणाली ऑनलाईन देयकामध्ये अनियमितता केल्या बाबत नोटीस देवून तीन दिवसात खुलासा सादर करणे बाबत कळविले होते.
विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांची चौकशी अधिकारी म्हणुन नेमणुक केली होती. त्याचा सहशिक्षक कदम यांनी ऑगस्ट मध्ये लेखी खुलासा गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, यांना देऊन त्याची पोहोच घेतली होती. त्या नंतर दिनांक २७ ऑगस्ट रोजी चौकशी अधिकारी दत्तात्रय चाटे हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ येथे आले. मुख्याध्यापक कदम यांनी त्यांना चौकशी बाबतचा लेखी खुलासा दिला.
त्यानंतर कदम यांनी दि.९ ऑक्टोबर रोजी चौकशीची माहिती घेण्यासाठी चौकशी अधिकारी चाटे यांची केज येथे जावुन भेट घेतली. त्या वेळी दत्तात्रय चाटे यांनी चौकशीचा अहवाल त्यांच्या बाजुने अनुकुल देण्यासाठी एक लाख रु. मागणी केली. त्या नंतर त्यांच्या ४० हजार रु. तडजोड झाली.
मात्र कदम यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना येथील लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक जाधवर यांच्याशी फोन वरून संपर्क साधला. त्या नंतर दि. १४ ऑक्टोबर रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. दुपारी ३:३० वा. च्या सुमारास कदम कार्यालयात गेले आणि त्यांनी चाटे यांना २० हजार रु. देण्यासाठी आणले असे सांगितले, दत्तात्रय चाटे याने शेजारी बसलेले सहशिक्षक जयगुरु गिरी यांचेकडे देण्याचा अंगुलीनिर्देश केला.
कदम यांनी पैसे गिरी यांच्याकडे देताच ते कार्यालयाच्या बाहेर आले आणि त्यांनी त्यांच्या खांद्यावरील रुमाल डाव्या हातात घेतला. हे पाहताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे आणि जयगुरु गिरी यांना ताब्यात घेतले.
पोलिस उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या फिर्यादी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचखोर दत्तात्रय चाटे आणि जयगुरु गिरी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. १७ ऑक्टोबर पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
केज शिक्षण विभागात लाचखोरीचे मोठे रॅकेट कार्यरत! :- केजच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयात तथाकथित कार्यकर्ते यांच्या कडून एखाद्या शाळेची किंवा मुख्याध्यापकांची तक्रार देऊन ती मिटविण्यासाठी चौकशीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार होत आहेत. शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी बनावट विद्यार्थी आणल्याचे आणि जास्त झालेले विद्यार्थी खाजगी शाळेला दिल्याच्या देखील चर्चा आहे.
निवास व भोजन व्यवस्थेत मोठा घोटाळा :- केज तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या पाल्यासाठी चालविण्यात येत असलेल्या वसतिगृह आणि भोजन व्यवस्थेत अनेक गैरप्रकार झालेल्या घटना आहेत. मात्र चौकशीच्या नावाखाली त्यात अनेकांनी हात ओले करून घेतले आहेत. तथाकथित तक्रार करणारे कार्यकर्ते तक्रार देताच त्यांच्यात आर्थिक व्यवहार आणि तडजोड झाल्या नंतर तक्रार गैरसमजुतीतून दिली किंवा समाधान झाले असे जे लेखी पत्र देतात त्यांचा नमुना एकच असून फक्त नावे वेगवेगळी असल्याची छुपी चर्चा आहे.
अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद :- दत्तात्रय चाटे आणि जयगुरु गिरी यांच्यावर झालेल्या कारवाईची माहिती मिळताच शिक्षक घोळक्याने पोलिस ठाण्यात जमा झाले होते.परंतु अनेकांच्या चेहऱ्यावर दुःख होण्या ऐवजी आनंद दिसत होता. तर अनेकजण एकमेकांशी हसून चर्चा करीत असल्याचे आढळून आले.