Beed Bribe Case | सावकारी परवान्यासाठी १३ हजारांची लाच; माजलगावच्या सहकार कार्यालयावर एसीबीचा सापळा!

सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे व सहकार अधिकारी सतीश शेरखाने रंगेहाथ जेरबंद; जालना एसीबीची धडक कारवाई
Beed Bribe Case | सावकारी परवान्यासाठी १३ हजारांची लाच; माजलगावच्या सहकार कार्यालयावर एसीबीचा सापळा!
Published on
Updated on

माजलगाव : माजलगाव येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सावकारीचा परवाना (लायसन्स) मंजूर करून देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे आणि सहकार अधिकारी (श्रेणी-२) सतीश शेरखाने यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी (३० जून) रंगेहाथ जेरबंद केले. या कारवाईमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने सावकारीचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला होता. संबंधित परवाना मंजूर करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्रस्त झालेल्या तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला.

मंगळवारी सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे आणि सहकार अधिकारी (श्रेणी-२) सतीश शेरखाने यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

माजलगाव तालुक्यात विविध शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने तक्रारी होत असताना ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात आहे. लाच दिल्याशिवाय काम होत नाही, अशी नागरिकांची भावना असतानाच एसीबीच्या या धडक कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

यापूर्वीही माजलगाव नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली होती. त्यानंतर सहकार विभागातील ही मोठी कारवाई ठरली असून, अशा कारवायांमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप बसण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news