Beed Sugarcane Crop Fire : भोपा येथे आगीत चार शेतकऱ्यांचा आठ एकरांमधील ऊस जळून खाक

कोरड्या दुष्काळात कष्टाने जगवलेल्या पिकाची राखरांगोळी; पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी
Sugarcane Crop Fire
Sugarcane Crop Fire
Published on: 
Updated on: 
अतुल शिनगारे

धारूर : धारूर तालुक्यातील भोपा येथे शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) दुपारी शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला आग लागून चार शेतकऱ्यांचा सुमारे आठ एकरांवरील ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत उपलब्ध पाण्याच्या आधारे कष्टाने ऊस जगवलेल्या शेतकऱ्यांवर आता आर्थिक संकट कोसळले आहे.

यंदा पावसाअभावी तालुक्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी झुंज देत आहेत. पाण्याची उपलब्धता कमी असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उसाचे पीक जगवले होते. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. ऊस जळून खाक झाल्याने अपेक्षित उत्पन्नावर पाणी फेरले गेले असून, जनावरांसाठी मिळणारा चाराही नष्ट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

उसाच्या शेताला आग लागल्याची माहिती तहसील कार्यालयाला देण्यात आल्यानंतर मंडळ अधिकारी सोपान वाघमारे आणि तलाठी सविता बट्टेवाड यांच्यासह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या आगीत बंडू शेषेराव जाधव, अलका ज्ञानेश्वर वाघचौरे, प्रमिला रामेश्वर वाघचौरे आणि शशिकला भीमराव वाघचौरे या चार शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली आहे.

आधीच दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. उसाच्या लागवडीसाठी केलेला खर्च, घेतलेले कष्ट आणि अपेक्षित उत्पन्न वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातच जनावरांसाठीचा चाराही नष्ट झाल्याने अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.

प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. दुष्काळी परिस्थितीत कष्टाने जगवलेले पीक आगीत नष्ट झाल्याने संबंधित शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news